भोई समाज महासंघाचा गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा; शिक्षण, संस्कार व रोजगाराचा दिला यशस्वी मंत्र

नांदेड / दाऊ गाडगेवाड
भोई समाजातील दहावी, बारावी उत्तीर्ण, पदवीधर तसेच औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भोई समाज महासंघ यांच्या वतीने नांदेड येथील कुसुम सभागृहात भव्य गुणवंत विद्यार्थी सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिक्षणासोबतच संस्कार, आत्मपरीक्षण, रोजगार, सामाजिक बांधिलकी आणि समाजऋणाची जाणीव ठेवून प्रगती करण्याचा संदेश उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमात प्रा. महेंद्र खेडकर यांनी विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणावर न थांबता रोजगाराच्या विविध संधी शोधण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.

प्रा. डॉ. अर्जुन भोई यांनी अत्यंत भावनिक शब्दांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “भोई समाजातील लेकरांनी मोठे व्हावे, यासाठी समिती सातत्याने कार्यरत आहे. समाजबांधवांनी या कार्याला भक्कम पाठिंबा द्यावा. मुलींनी आपल्या कुटुंबाचा व समाजाचा स्वाभिमान जपत शिक्षण आणि कर्तृत्वाच्या बळावर यश मिळवावे. संघर्षाशिवाय यश मिळत नाही. तुम्ही समाजाचे ऋणी आहात आणि हे ऋण शिक्षण, प्रामाणिकपणा व समाजसेवेच्या माध्यमातून फेडले पाहिजे. ज्ञानाची गंगा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी तुमची आहे.”

डॉ. अनिल गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षणाचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, “जास्त गुण मिळाले म्हणून हुरळून जाऊ नका आणि कमी गुण मिळाले म्हणून खचूनही जाऊ नका. स्वतःचे आत्मपरीक्षण करा, अंधश्रद्धेपासून दूर राहा आणि विवेकाच्या मार्गाने वाटचाल करा.” असा संदेश दिला. प्रा. अर्चिता मडके यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.

प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवादासाठी स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना केली. “सत्कारापेक्षा विद्यार्थ्यांना योग्य संस्कार देणे अधिक महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम करून शारीरिक संपत्ती मजबूत ठेवावी,” असे त्यांनी सांगितले. याच वेळी त्यांनी मयत प्रा. राजू डुबुकवाड यांच्या दोन्ही मुलांना दत्तक घेतले असून शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. या कार्यक्रमात आ. आनंदराव बोंढारकर पाटील, गोपाळराव धारपवार यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्हिडिओ कॉलद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे नांदेड जिल्हा प्रवक्ते निलेश देशमुख बारडकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन भोई समाज महासंघाचे अध्यक्ष राजुआण्णा मामुलवार यांनी केले, तर गंगाधर डुबुकवाड यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीत संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला भोई समाजातील विद्यार्थी, पालक, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच संस्कार, आत्मविश्वास, रोजगाराभिमुखता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.



