Uncategorized

ज्येष्ठ साहित्यिक-कलावंतांच्या मागण्यांसाठी २५ ऑगस्टला ‘भजन आंदोलन’

मानधन वाढीसह नऊ मागण्यांचा एल्गार

नांदेड : विजय वाठोरे

 

जिल्ह्यातील वयोवृद्ध ज्येष्ठ साहित्यिक, शाहीर आणि लोककलावंतांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २५ ऑगस्ट २०२६ रोजी लोकशाही व सनदशीर मार्गाने एकदिवसीय ‘भजन आंदोलन’ करण्यात येणार आहे.याबाबत बहुजन टायगर युवा फोर्स, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

जिल्ह्यात विविध क्षेत्रांत लोकपरंपरा आणि लोककलेचे जतन करणारे मोठ्या संख्येने कलावंत आहेत. मात्र शासनाकडून मिळणारे सध्याचे दरमहा ५ हजार रुपयांचे मानधन अत्यंत तुटपुंजे असून, वाढत्या महागाईच्या काळात त्यातून कलावंतांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे मानधनात वाढ करून ते किमान १० हजार रुपये करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांसाठी विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील वयोवृद्ध कलावंतांची संख्या लक्षात घेऊन मानधनासाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या वाढविणे, मानधनासाठीची वयोमर्यादा ५० वरून ४० वर्षे करणे, तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत कलावंतांना समाजप्रबोधन व जनजागृतीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, या मागण्यांचा समावेश आहे.

याशिवाय केंद्र शासनाकडून वयोवृद्ध कलावंतांच्या मानधनात कपात झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मानधनात किमान १० हजार रुपयांची वाढ करावी, कलावंतांना मोफत घरकुल तसेच त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षणाची सुविधा द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

१६ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार संबंधित योजना ग्रामपंचायत विभाग व जिल्हा परिषदांकडे वर्ग करण्यात आली असून ती योजना पूर्ववत जिल्हा समाजकल्याण विभागाकडे सोपविण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नामवंत साहित्यिक, शाहीर आणि कलावंतांचा सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मान करावा, नांदेड शहरात सांस्कृतिक भवन उभारावे, तसेच जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीसाठी स्वतंत्र बैठक कक्ष उपलब्ध करून द्यावा, या मागण्याही मांडण्यात आल्या आहेत.

 

‘कलावंतांच्या कलेला सन्मान आणि जगण्याला आधार द्या’

 

लोककला, शाहिरी आणि साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या कलावंतांना केवळ सन्मानाच्या शब्दांऐवजी जगण्यासाठी ठोस आर्थिक आधार आणि रोजगाराच्या संधी मिळणे गरजेचे आहे. शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

 

बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे (पत्रकार), प्रदेश सचिव डॉ. मनोज राऊत , प्रवक्ता लक्ष्मणराव भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन सादर करण्यात आले आहे.२५ ऑगस्टचे भजन आंदोलन हे केवळ मागण्यांचे निवेदन न राहता, ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांच्या सन्मानाच्या आणि जगण्याच्या प्रश्नासाठीचा आवाज ठरणार का, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button