आश्रमशाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांनी मुख्यालयी राहावे; अन्यथा कारवाईची मागणी

हिमायतनगर / दाऊ गाडगेवाड
शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापक यांनी नियमानुसार मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना अनेक ठिकाणी या नियमाचे पालन होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गोकुंदा ता. किनवट, जि. नांदेड येथील प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आश्रमशाळांमध्ये कार्यरत शिक्षक व मुख्याध्यापक हे मुख्यालयी राहत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांनी शाळेजवळ वास्तव्यास राहणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन काढताना ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील आणि तलाठी यांच्या प्रमाणपत्राच्या आधारेच वेतन मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ज्या शिक्षकांना शासकीय निवासस्थान उपलब्ध असूनही ते राहत नाहीत, त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी. तसेच आवश्यक असल्यास घरभाडे भत्ता कपात करावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, निवासस्थान नसलेल्या शिक्षकांनी शाळेपासून पाच किलोमीटरच्या परिसरात राहणे बंधनकारक करावे. नियमांचे पालन न करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनासह कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनकर्ते सोनबा केदोजी वानोळे यांनी केली आहे. सदर निवेदनाची दखल घेऊन संबंधित विभागाकडून काय कारवाई होते, याकडे विद्यार्थ्यांचे पालक व स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.



