संतुलित खत वापर काळाची गरज; अवाजवी वापराने वाढते कॅन्सरचे प्रमाण
पळसपूर येथे १ जून रोजी ‘माती वाचवा, शेती जगवा’ शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

हिमायतनगर / दाऊ गाडगेवाड
तालुक्यातील पळसपूर येथे रासायनिक खतांच्या अवाजवी व असंतुलित वापरामुळे जमिनीची सुपीकता झपाट्याने घटत असून उत्पादन खर्चातही मोठी वाढ होत आहे. यासोबतच अन्नातील रासायनिक अवशेषांमुळे कॅन्सरसह विविध दुर्धर आजारांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर ‘संतुलित खत वापर काळाची गरज’ या विषयावर आधारित ‘माती वाचवा, शेती जगवा’ शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कृषी विभाग, हिमायतनगर व कृषी विज्ञान केंद्र, पोखरणी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी सकाळी ८:२५ वाजता नागनाथ मंदिर, पळसपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, पोखरणी येथील ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ प्रा. कल्याणकर सर, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख तसेच तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग हिमायतनगर हे उपस्थित राहून शेतकऱ्यांना संतुलित खत व्यवस्थापन, माती परीक्षण, सेंद्रिय शेती, उत्पादन खर्च कमी करण्याचे उपाय आणि आरोग्यदायी शेती पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमास परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



