Uncategorized

पळसपूर येथे महिला शेतकरी प्रमाणपत्र कॅम्प व नैसर्गिक शेती मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

 

 

हिमायत नगर / विष्णु जाधव

 

जागतिक महिला वर्ष आणि महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ अंतर्गत मौजे पळसपूर येथे हनुमान मंदिर परिसरात आज बुधवारी “महिला शेतकरी प्रमाणपत्र ऑनलाईन कॅम्प” व “नैसर्गिक शेती मार्गदर्शन मेळावा” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कॅम्पचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ज्या महिलांच्या नावावर स्वतःची शेतजमीन नाही, अशा भूमिहीन महिलांनाही ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ ऑनलाईन करण्यात आले या मध्ये २२७ महिलांचे प्रमाण पत्र काढण्यात आले. या प्रमाणपत्राच्या माध्यमातून महिलांना शेती, शेतीपूरक व्यवसाय आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ घेता येणार आहे.

 

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा नांदेड येथील आत्मा उप प्रकल्प संचालक गुंजकर मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी गावातील कृषी सखी व सर्व महिला भगिनींशी संवाद साधत महिला शेतकरी प्रमाणपत्राचे महत्त्व, त्याचे फायदे आणि शासनाच्या विविध योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच या मेळाव्यात कृषी सहाय्यक अधिकारी हनुमंत नंदनवार, पोखरा समन्वयक साईनाथ अन्नछत्रे आणि कृषी मित्र कल्याण वानखेडे यांनी नैसर्गिक शेती, जैविक शेती व सेंद्रिय शेती का करावी आणि त्याचे फायदे काय आहेत, याबाबत शेतकऱ्यांना व महिलांना मार्गदर्शन केले.

आत्मा तालुका प्रतिनिधी ए टी एम, बी टी एम, आनंद बोईनवाड, दर्शन घुमनवाड यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले. बोईनवाड यांनी जीवामृत, दशपर्णी अर्क, लिंबोळी अर्क निर्मिती व त्याच्या वापराची प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली. रेशीम शेती मार्गदर्शनासाठी ब्राम्हणगाव येथील रेशीम रत्न पुरस्कार प्राप्त नईम पठाण यांनी शेतकऱ्यांना आपला अनुभव सांगत रेशीम शेतीबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आयोजन नवयुवक गणेश मंडळ पळसपूर यांच्यावतीने करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष तुकाराम वानखेडे, गोविंद सूर्यवंशी, विष्णू वानखेडे आणि सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक बाबुराव वानखेडे, वामनराव वानखेडे, संदीप वानखेडे, गजानन वानखेडे, उपसरपंच गजानन देवसरकर, ग्रामपंचायत कर्मचारी सतीश वाडेकर, रोजगार सेवक बबन वाडेकर, पंजाब कदम, बाळू पतंगे, संजय वानखेडे, , केदार वानखेडे, ज्येष्ठ महिला कमलबाई वानखेडे तसेच मोठ्या संख्येने महिला कृषी सखी व महिला भगिनी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button