कै. कुसुमताई शंकररावजी चव्हाण अनुदानित प्राथमिक आदिवासी आश्रम शाळेने महत्वाची माहिती लपविली- सोनबा वानोळे

हिमायतनगर / विष्णु जाधव
कै. कुसुमताई शंकररावजी चव्हाण अनुदानित प्राथमिक आदिवासी आश्रम शाळा भोकर, पोस्ट बेसिक आदीवासी आश्रम शाळा भोसी ह्या दोन्ही भोकर तालुका येथील शाळेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हिमायतनगर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सोनबा वानोळे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेल्या माहितीसंदर्भात शाळा प्रशासनाने टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

वानोळे यांच्या म्हणण्यानुसार, प्रथम अपिलीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट यांनी संबंधित शाळेला माहिती देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, या आदेशानंतरही शाळेकडून अपूर्ण माहिती देण्यात आली आणि काही महत्त्वाची माहिती जाणीवपूर्वक लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत बोलताना वानोळे यांनी शाळेचे मुख्याध्यापक व सचिव यांच्यावर गंभीर आरोप करत, “शाळेतील गैरव्यवहार बाहेर येऊ नयेत म्हणून माहिती लपवली जात आहे,” असा दावा केला. तसेच माहिती अधिकार अर्जाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
वानोळे यांनी पुढे सांगितले की, मुख्याध्यापकांनी पूर्ण माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला असून त्यांच्या वागणुकीत नम्रतेचा अभाव असल्याचेही जाणवले. “माहिती अधिकार कायद्याला कुचकामी करण्याचा प्रयत्न काही अधिकारी करत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असे ते म्हणाले. दरम्यान, या प्रकरणात संबंधित प्रकल्प अधिकारी प्रत्यक्षात कारवाई करतील का, हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे शाळेच्या कारभाराबाबत शंका निर्माण झाली असून, याची सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे. यावेळी वानोळे यांनी माहिती अधिकार कायदा आणखी कठोर करण्याची गरज असल्याचेही प्रसार माध्यमांसमोर मत व्यक्त केले आहे.



