भोई समाज महासंघाच्या स्वतंत्र विचारसरणीतून समाजसेवेचा वसा
जिल्हाध्यक्ष राजुअण्णा मामुलवार यांचे उद्गार

हिमायतनगर / दाऊ गाडगेवाड
नांदेड जिल्ह्यातील भोई समाज महासंघ हा समाजकार्याच्या माध्यमातून समाज बांधवांच्या अडीअडचणी, प्रश्न व समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी सतत कार्यरत आहे. महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा. राजुअण्णा मामुलवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी २४ तास ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष भेटीद्वारे समाजातील लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि त्यावर तत्परतेने उपाय करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून आणि विशेषतः मागील पाच वर्षांपासून नांदेड जिल्ह्यात महासंघामार्फत विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम, समाजहिताचे उपक्रम तसेच समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी छोटे-मोठे निर्धार महामेळावे आयोजित करण्यात आले आहेत.
समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि मान्यवरांना एकत्र आणून त्यांच्यासमोर समाजाच्या अडचणी मांडण्याचे काम महासंघ सातत्याने करत आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये तन, मन आणि धनाने सहभाग घेऊन समाज बांधवांशी आपुलकीने, जिव्हाळ्याने आणि माणुसकीच्या भावनेतून वागण्याची भोई समाज महासंघाची परंपरा आहे.
समाजातील प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होऊन समाज बांधवांना धीर देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भोई समाज महासंघ सदैव तत्पर आहे. नांदेड जिल्ह्यातील भोई समाजाच्या प्रश्नांसाठी महासंघ नेहमीच अग्रस्थानी राहून समाजसेवेचे कार्य करत आहे.
समाज बांधवांची निस्वार्थ सेवा करण्याचा संकल्प घेऊन भोई समाज महासंघ, नांदेड आपल्या सेवेसाठी सदैव हजर आहे असे उद्गार प्रसार माध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष राजुआण्णा मामुलवार यांनी वक्तव्य केले आहे.



