भोई समाज महासंघ, नांदेडतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन

नांदेड / विष्णु जाधव
भोई समाज महासंघ, नांदेडच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. २७ जून २०२६ रोजी कुसुम सभागृह, नांदेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे.
समाजातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महासंघाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी आपापली जबाबदारी स्वीकारून सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भोई समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा. राजुआण्णा मामुलवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. समाजातील मच्छीमार बांधवांच्या अडचणी सोडविणे, शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक कार्यांना चालना देणे यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात विविध कल्पक आणि समाजोपयोगी कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत.
यावर्षीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे नियोजनही मोठ्या उत्साहात करण्यात येत असून कार्यक्रम अधिक भव्य आणि यशस्वी करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने सहकार्य करावे, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे. दि. २७ जून २०२६ रोजी होणाऱ्या या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन भोई समाज महासंघ, नांदेडतर्फे करण्यात आले आहे.



