Uncategorized

“कृषी विभाग शेतकऱ्याच्या बांधावर; बीबीएफ पद्धतीने कोरडवाहू शेतीला नवे बळ”

 

हिमायतनगर / विष्णु जाधव

हिमायतनगर तालुक्यात हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या अनिश्चित पावसाच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. ‘कृषी विभाग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत कृषी अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत आहेत.

मंगळवारी सिरंजणी, शेलोडा आणि पळसपुर परिसरात कृषी सहाय्यक हनुमंत नंदनवार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) सहाय्यक साईनाथ अन्नछत्रे आणि कृषी मित्र कल्याण वानखेडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत बीबीएफ पद्धतीचे प्रात्यक्षिक दिले.

कृषी सहाय्यक हनुमंत नंदनवार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सुमारे ८० टक्के शेती ही कोरडवाहू आहे. बदलत्या हवामानामुळे कधी अतिवृष्टी तर कधी दीर्घ पावसाळी खंड अशी परिस्थिती निर्माण होत आहेत. अशावेळी पावसाचे पाणी शेतात अडवणे आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे अत्यंत गरजेचे असून बीबीएफ पद्धत यासाठी प्रभावी उपाय ठरत आहे.

पोक्रा सहाय्यक साईनाथ अन्नछत्रे यांनी बीबीएफ पद्धतीचे प्रात्यक्षिक देताना सांगितले की, ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे १३५ सेमी रुंदीचा वरंबा आणि ४५ सेमी सरी तयार केली जाते. या वरंब्यावर दोन किंवा तीन ओळींमध्ये सोयाबीन, कापूस किंवा तूर पेरणी केली जाते. यामध्ये बियाणे आणि खत योग्य खोलीवर एकाच वेळी दिले जाते.

कृषी मित्र कल्याण वानखेडे यांनी या पद्धतीला “हवामानाचा सरीदूत” असे संबोधत सांगितले की, अति पावसात सरीमधून पाण्याचा निचरा होतो, त्यामुळे पिकांचे नुकसान टळते. तसेच पावसाचा खंड पडल्यास वरंब्यात साठलेला ओलावा पिकांना उपयोगी पडतो, त्यामुळे कमी पावसातही पीक तग धरते.

या पद्धतीमुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन होते, बियाणे व खतांची सुमारे २० टक्के बचत होते आणि उत्पादनात १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ होते. तसेच पेरणी, सरी तयार करणे आणि खत देणे ही कामे एकाचवेळी होत असल्याने वेळ व खर्चात बचत होते. आंतरमशागत सोपी होते आणि जमिनीची धूपही कमी होते. यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, बीबीएफ पद्धतीने पेरणी केल्यानंतर ४८ तासांच्या आत उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी करावी. त्यामुळे सुरुवातीच्या काळात तण नियंत्रण होऊन पिकांची वाढ चांगली होते. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळत असून बदलत्या हवामान परिस्थितीत शेती अधिक सक्षम करण्यासाठी हा महत्त्वाचा प्रयत्न ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button