भोई समाजाच्या विविध मागण्यांसाठी ७ सप्टेंबरला नांदेडमध्ये ‘जनआक्रोश धडक महामोर्चा
सकल भोई समाज व भोई समाज महासंघाचा एल्गार; समाजाच्या हक्कांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

नांदेड : विजय वाठोरे
भोई समाजाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व व्यावसायिक मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल भोई समाज व भोई समाज महासंघ, नांदेड यांच्या वतीने सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता नांदेड शहरात ‘एल्गार जनआक्रोश धडक महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. या महामोर्चाच्या माध्यमातून भोई समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
महामोर्चाची सुरुवात महात्मा फुले पुतळा – आय.टी.आय. चौक – शिवाजी नगर – वजीराबाद (हनुमान पेठ) – शिवाजी पुतळा – जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड या मार्गाने होणार आहे.
भोई समाजाचा पारंपरिक मासेमारी व्यवसाय असून, बदलत्या परिस्थितीत या व्यवसायावर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आयोजकांनी केली आहे. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी मोठ्या संख्येने समाजबांधवांनी महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महामोर्चाच्या माध्यमातून भोई समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी शैक्षणिक व आर्थिक सवलती देणे, तसेच समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ देण्याची मागणी करण्यात आली आहे.
नांदेड शहरातील चिखलवाडी भोई गल्ली झोपडपट्टीचे पुनर्वसन करावे, तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी पारंपरिक मच्छीमार भोई समाजाला मासे विक्रीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देऊन मार्केट उभारावे, अशीही मागणी आहे.
पारंपरिक मच्छीमारांसाठी स्वतंत्र धोरणाची मागणी
महाराष्ट्रातील मच्छीमारांसाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणीही करण्यात आली आहे. पारंपरिक मच्छीमारांसाठी केंद्र व राज्य शासनाने शेती व कृषी उद्योजकांप्रमाणे सवलती लागू कराव्यात, जिल्ह्यातील लहान-मोठ्या धरणांमधील मत्स्यव्यवसायाचे परवाने देताना प्राधान्य पारंपरिक मच्छीमारांना द्यावे, तसेच संबंधित संस्थांमधील अनधिकृत संस्था व सभासद रद्द करून पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांना न्याय द्यावा, अशी भूमिका घेण्यात आली आहे.
मराठवाड्यातील मच्छीमारांसाठी शासन निर्णय कायम करावा, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांमध्ये कार्यरत मच्छीमारांना सभासद करून घ्यावे, जलसंपदा विभागाच्या वतीने नवीन धरणे व विलास प्रकल्पांतर्गत पारंपरिक मच्छीमारांच्या सहकारी संस्थांना पूर्ववत ठेके देण्यात यावेत, तसेच मत्स्य सहकारी संस्थांचे प्रलंबित प्रश्न व सभासदांचे प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
याशिवाय शासनाने वेळोवेळी निर्माण केलेल्या योजना व सवलती प्रभावीपणे राबवून त्याचा लाभ समाजाला तात्काळ मिळावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
महामोर्चाच्या निवेदनात नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. संत भिमाभाई स्मारक, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, अभ्यासिका केंद्र तसेच समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
विविध तालुक्यांमध्ये समाजाच्या विकासासाठी आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात, तसेच भोई समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी शासनाने स्वतंत्रपणे ठोस धोरण आखावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
महामोर्चाच्या मागण्यांमध्ये वीर शहीद जवान नरसिंग शिवाजी जिल्लेवाड यांच्या स्मारकासाठी भोकर येथील मुदखेड रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच विविध सामाजिक व वैयक्तिक प्रकरणांमध्ये शासनस्तरावर न्याय मिळावा, अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश करण्यात आला आहे.
भोई समाजाच्या हक्कांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या महामोर्चात समाजबांधव, युवक-युवती, महिला मंडळे, व्यापारी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी तसेच विविध क्षेत्रात कार्यरत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल भोई समाज व भोई समाज महासंघ नांदेड यांच्या वतीने



