शासकीय आश्रमशाळांतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा
सहा आश्रमशाळांची विशेष पथकामार्फत तपासणी करण्याची मागणी; संबंधितांवर कारवाईची मागणी

हिमायतनगर / विष्णु जाधव
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवट यांच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमध्ये कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निवेदन साद करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवटच्या अंतर्गत एकूण १६ शासकीय आश्रमशाळा असून त्यापैकी १५ शाळांची अपुरी माहिती प्रकल्प कार्यालयाकडून प्राप्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. माहिती अधिकारातून १ एप्रिल २०२३ ते ३० मार्च २०२६ या कालावधीतील मागविण्यात आलेली माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.या माहितीच्या आधारे काही आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भाजीपाला, फळे, अंडी, मटन, चिकन तसेच भोजन व नाश्त्यासाठीच्या साहित्याच्या खरेदीमध्ये अनियमितता व कथित भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच काही शाळांची अपेक्षित माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर सारखणी, उमरी बा., जलधरा, कुपटी, दुधड आणि केदारगुडा या शासकीय आश्रमशाळांची विशेष पथकामार्फत तात्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. चौकशीत अनियमितता किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन सोनबा केदोजी वानोळे यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना साद केले असून, विद्यार्थ्यांच्या भोजन व शैक्षणिक सुविधांशी संबंधित बाबींमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.



