पळसपुर जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आगळावेगळा उपक्रम
दर महिन्याला स्पर्धा परीक्षेचे आयोजन; शिक्षणप्रेमींच्या सहकार्याने सरकारी शाळेला नवी दिशा

हिमायतनगर / दाऊ गाडगेवाड
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा आणि विद्यार्थ्यांचा बौद्धिक तसेच शारीरिक विकास व्हावा, या उद्देशाने पळसपुर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांकडून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. सरकारी शाळांमध्येही गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळू शकते, हा विश्वास पालक व ग्रामस्थांमध्ये निर्माण करण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू आहे. पळसपुर जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याला स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच सामान्यज्ञान, चालू घडामोडी, गणित, भाषा, तर्कशक्ती आदी विषयांचा सराव करून घेण्यात येत आहे. स्पर्धात्मक वातावरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण होण्याबरोबरच आत्मविश्वास, चिकाटी आणि निरोगी स्पर्धेची भावना वाढीस लागण्यास मदत होत आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात पुढे जाता यावे, यासाठी पळसपुर येथील शिक्षणप्रेमी नागरिकांकडूनही शाळेतील शिक्षकांना वेळोवेळी सहकार्य केले जात आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध शैक्षणिक साहित्य, बक्षिसे तसेच उपक्रमांसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षणप्रेमी नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण होत आहे.

सरकारी शाळा वाचवण्यासाठी शिक्षकांची धडपड
आजच्या काळात अनेक पालकांचा कल खासगी शाळांकडे वाढत असताना सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या टिकवून ठेवणे आणि वाढविणे हे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर पळसपुर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक केवळ नियमित अध्यापनापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण निर्माण करणे, देशभक्तीची भावना रुजविणे, शारीरिक तंदुरुस्तीला चालना देणे आणि बौद्धिक क्षमता विकसित करणे, यावर शाळेच्या उपक्रमांमध्ये विशेष भर दिला जात आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी देशभक्तीचा गजर
आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची माहिती विद्यार्थ्यांना देत देशाच्या इतिहासाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान मिळत नाही, तर इतिहास, देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय मूल्यांचीही ओळख होते.

सशक्त आणि बौद्धिक विद्यार्थी घडविण्यावर भर
‘शिक्षण म्हणजे केवळ गुण मिळविणे नव्हे, तर सक्षम व्यक्तिमत्त्व घडविणे’ या विचारातून शाळेत विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास साधण्याचा प्रयत्न शिक्षकांकडून केला जात आहे. दर महिन्याला घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा, विविध शैक्षणिक उपक्रम, देशभक्तीपर कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून होणाऱ्या विविध कृती यामुळे शाळेतील वातावरण अधिक उत्साही होत आहे. पळसपुर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची ही धडपड आणि शिक्षणप्रेमी नागरिकांचे सहकार्य यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विविध संधी उपलब्ध होत आहेत. सरकारी शाळेबद्दलचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त होत असून शिक्षकांचेही कौतुक होत आहे



