कंधारच्या मच्छी मार्केटची दयनीय अवस्था; घाणीच्या साम्राज्यात मच्छी विक्री, भोई समाज महासंघ आंदोलनाच्या विचाराधीन

नांदेड / दाऊ गाडगेवाड
कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मच्छीमार बांधव अत्यंत अस्वच्छ आणि गैरसोयीच्या परिस्थितीत रस्त्याच्या कडेला व नाल्यालगत बसून मच्छी विक्री करत आहेत. स्वतंत्र मच्छी मार्केटची मागणी वारंवार करूनही कंधार नगरपालिकेकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भोई समाज महासंघ नांदेड यांनी केला आहे.
मच्छीमार बांधवांकडे शेती किंवा अन्य कोणताही मोठा व्यवसाय नसल्याने मच्छी विक्री हाच त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे. मात्र नगरपालिकेने आजपर्यंत स्वतंत्र मच्छी मार्केट उभारले नसल्यामुळे त्यांना घाणीच्या साम्राज्यात, नाल्याशेजारी बसून व्यवसाय करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, परिसरातील काही नागरिकांकडून याच ठिकाणी नारळाचे टपर, घाण कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून स्वच्छतेचा पूर्णतः अभाव आहे. या अस्वच्छतेमुळे ग्राहकही आक्षेप घेत असून मच्छीमारांच्या व्यवसायावर त्याचा थेट परिणाम होत आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, नगरपालिका दररोज मच्छीमारांकडून दहा रुपयांची पावती (शुल्क) वसूल करते; मात्र त्याबदल्यात परिसराची नियमित साफसफाई केली जात नाही, असा आरोप मच्छीमारांनी केला आहे. शुल्क घेऊनही मूलभूत सुविधा न देणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे समाजबांधवांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
भोई समाज महासंघ नांदेड यांनी कंधार शहरातील मच्छीमारांना तातडीने स्वतंत्र, स्वच्छ व सर्व सोयींनी युक्त मच्छी मार्केट उपलब्ध करून द्यावे, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याच्या विचाराधीन आहे.
“मच्छीमारांना त्रास देण्यापेक्षा त्यांना सन्मानाने व्यवसाय करता येईल अशी स्वतंत्र जागा द्या. घाणीच्या साम्राज्यात व्यवसाय करण्याची वेळ येणे ही नगरपालिकेसाठी लाजिरवाणी बाब आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया भोई समाज महासंघाने व्यक्त केली आहे.



