२५ वर्षांनंतर दहावीचे मित्र एकत्र; महागावात स्नेहमिलन सोहळा थाटामाटात संपन्न
जीवनातील सुख-दु:ख, जुन्या आठवणींना उजाळा - भावनिक क्षणांनी भरला कार्यक्रम

सैलेश वानखेडे / फुलसावंगी-
आधुनिक धकाधकीच्या जीवनात शालेय काळातील मैत्री आणि आठवणींना पुन्हा जिवंत करण्याचा उत्तम माध्यम म्हणजे स्नेहमिलन कार्यक्रम. हे सोहळे केवळ भूतकाळातील धूळ झटकून टाकत नाहीत, तर जीवनाला नवीन ऊर्जा आणि संजीवनी देतात. असाच एक अविस्मरणीय आणि भावनिक स्नेहमिलन सोहळा नुकताच फुलसावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यालयाच्या सन २०००-२००१ च्या दहावी बॅचचा पार पडला. तब्बल २५ वर्षांच्या दीर्घ अंतरानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले हे माजी विद्यार्थी एकत्र आले आणि जुन्या आठवणींमध्ये रमले.
२ नोव्हेंबर २०२५, रविवार रोजी महागाव येथील मोटरवार मंगल कार्यालयात हा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबई, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर यासारख्या महानगरांपासून ते अमरावती, पुसद, आर्णी, यवतमाळ अशा छोट्या-मोठ्या शहरांमधून हे मित्र दाखल झाले. या बॅचची वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे यातील अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वी झाले आहेत. पोलीस दल, सैन्यदल, शिक्षण क्षेत्र, पत्रकारिता, अभियांत्रिकी आणि उद्योग व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत ते कार्यरत आहेत. राज्याच्या प्रगतीत आणि समाजाच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
शालेय काळातील खट्याळपणा, मैत्रीचे बंध, शिक्षकांचा आधार, परीक्षेतील धडपड, यशाचे क्षण आणि अपयशातील शिकवणूक यावर विद्यार्थींनी मनमोकळ्या चर्चा केल्या. काहींनी आपल्या यशोगाथा सांगितल्या – कसे कष्टाने आणि मेहनतीने त्यांनी जीवनात स्थिरावले. तर काहींनी आव्हानांवर मात करण्याच्या प्रेरणादायी कहाण्या शेअर केल्या, ज्यात कुटुंबीयांचा साथ, मित्रांचा आधार आणि स्वतःची जिद्द यांचा मोठा वाटा होता. अनेक क्षण असे होते जेव्हा उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. “२५ वर्षांनंतरही ही मैत्री तितकीच मजबूत आहे,” असे भावनिक उद्गार काढत अनेकांनी एकमेकांना मिठी मारली.
कार्यक्रमात मनोरंजनाचा भागही रंगला. जुन्या गाण्यांचे सूर, शालेय नाटुकले आणि खेळ यांनी वातावरण उत्साहपूर्ण केले. या कार्यक्रमाचर सूत्रसंचालन तस्लिम शेख यांनी तर आभार प्रदर्शन रवी शर्मा यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी पुन्हा अशा भेटी घडवण्याचे आणि नियमित संपर्क ठेवण्याचे वचन दिले.



