रेतीमाफियांपुढे महसूल विभाग हतबल, 🔹हप्तासंस्कृतीचा मोह आवरेना !
फुलसावंगीच्या घाटात थेट जेसीबीने रेती उपसा

फुलसावंगी / सैलेश वानखेडे
पैनगंगा नदीपात्रातील फुलसावंगी घाट सध्या रेतीतस्करांसाठी हॉटस्पॉट ठरला आहे. येथील रेतीला महागावसह पुसद, उमरखेड भागात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे या परिसरात अवैध रेती उत्खननासाठी तस्करांच्या टोळ्याच उतरल्या आहे. थेट जेसीबी यंत्र लावून रेती उपसा केला जात असताना महसूलसह पोलिसांची यंत्रणा मात्र धृतराष्ट्राच्या भूमिकेत असल्याची स्थिती आहे.
काही दिवसापूर्वीच पावसाने उसंत घेतली. अतिवृष्टीमुळे यंदा हजारो ब्रास रेती दीघडी उच्च पातळी बंधाऱ्याजवळ जमा झाली. बंधाऱ्याचे गेट बंद होताच वाळू माफियांनी अधिक रेती उत्खननासाठी सोमवारी रात्री थेट जेसीबी मशीनने वाळू उपसा केल्याचे वृत्त फुलसावंगीत सकाळी वाऱ्यासारखे पसरले. एकंदरीत वाळू माफियाची जेसीबी मशीन पैनगंगा नदी पात्रात उतरवण्या मजल होते, म्हणजे महसूल विभाग या वाळू तस्करांपुढे हतबल झाला आहे का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. सिंचनासाठी दीघडी बंधाऱ्याचे दार बंद करण्यात आले. त्यामुळे यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत जास्त वाळू साठा बंधाऱ्याच्या दाराजवळ जमा झाला. त्यामुळे तस्करांनी ४० पेक्षाही जास्त ट्रॅक्टर रेती वाहतुकीसाठी लावले. प्रत्येक ट्रॅक्टरवर १० ते १५ मजूर शिवाय ड्रायव्हर, वाळू चोरी करणारे खुद्द माफिया तसेच महसूल विभागाच्या हालचालीवर पाळत ठेवण्यासाठी ठेवलेले प्रत्येकाचे ५ ते ६ पंटर असा फौजफाटा येथील नदीपात्रात दररोज गोळा होऊन वाळू चोरी करत आहेत. प्रचंड गर्दी या ठिकाणी रेती तस्करांची वाढली आहे.
#निश्चित कारवाही करूः तहसीलदार
वाळू चोरीवर अंकुश लावण्यासाठी महसूल प्रशासन अतोनात प्रयत्न करत आहे. यामध्ये बहुतांश प्रशासन यशस्वी झाले आहे. फुलसावंगीमध्ये अजून काही तस्करीचा प्रकार वाढला असेल तर त्यावर निश्चित कारवाही करू, अशी प्रतिक्रिया महागावचे तहसीलदार अभय मस्के यांनी दिली.
#महसूल विभागाच्या उपाययोजना तोकड्या
महसूल विभागाने रेतीमाफियासाठी जणू रान मोकळं करून दिले आहे. येथे ६० ट्रॅक्टर अहोरात्र पैनगंगा दिगडी उच्च पातळी बंधाऱ्याजवळून रेतीचा अवैध उपसा करीत आहे. गावाच्या चारीही बाजूंच्या निर्जनस्थळी, हिंगणी पाणंद रस्त्यावर रेतीची साठवणूक केली जात आहे. महागाव, पुसद, उमरखेडच्या माफियांशी संपर्क साधून त्यांना रेती विकून प्रशासनाच्या नाकावर टिचून वाहतूक केली जात आहे.
#गुन्हेगारांसह पांढरपेशी तस्करीत सामील
रेती तस्करीत पूर्वाश्रमीचे गुन्हेगार, राजकीय पक्षांचे तालुकास्तरीय पदाधिकारीही उतरले. चोरीची रेती महागाव, पुसद, उमरखेडच्या रेती माफियांना विकली जाते. फुलसावंगी एकंदरीत जिल्ह्याचा वाळू चोरीचा केंद्रबिंदू ठरत आहे.
#ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची चाळणी
रेतीच्या ओव्हरलोड वाहनांमुळे फुलसावंगी ते हिंगणी जाणाऱ्या रस्त्याची चाळणी झाली असून विद्यार्थ्यांसह प्रवाशांना वाहने कशी चालवावी, हा प्रश्न आहे. दिघडी बंधाऱ्याचे दारे बंद होताच वाळू चोरटे बंधाऱ्याच्या पुलाखाली एकच गर्दी करतात. यामुळे या बंधाऱ्याचे अस्तित्व धोक्यात येत आले आहे.
💥💥💥💥💥💥💥
*उपविभागीय भरारी पथकाला फुलसावंगीची एलर्जी*
उपविभागीय अधिकारी यांचे गौण खनिज अवैध उत्खननावर अंकुश लावण्यासाठी तयार केलेल्या पथकात माफिया वर कारवाई करण्यात हातखंडा असलेले मंडळ अधिकारी गजानन सुरोशे असतांनाही हे पथक फुलसावंगीत होणाऱ्या रेती उत्खननावर कारवाई करण्यासाठी आज पर्यंत येथे आले नसल्याने या पथकाला फुलसावंगीची एलर्जी आहे की काय असे म्हणायची वेळ आली आहे.



