रेती माफियांच्या टिप्परला ‘अभय’ कोणाचे ? तहसील समोरून राजरोस वाहतूक! महसुल अधिकारी रेती माफियांच्या गराड्यात
सैलेश वानखेडे फुलसावंगी प्रतिनिधी /
येथील पैनगंगा नदी आणि नाल्यांतून अवैध उत्खनन करून साठवलेली रेती महागाव, पुसद आणि उमरखेड येथील रेती माफियांकडून दिवस-रात्र सुमारे १५ ते २० टिप्परने वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे, या ‘दबंग’ रेती माफियांना महसूल विभागातील कोणाचे ‘अभय’ आहे, असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे, कारण ही वाहतूक महागाव तहसील कार्यालयाच्या अगदी समोरून निर्भय पणे सुरू आहे. रेती माफियांचे एवढे धाडस होत असतानाही त्यांच्या टिप्परवर कोणतीही कारवाई का? होत नाही, हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे. स्थानिक वृत्तपत्रांत बातम्या प्रसिद्ध झाल्यास, केवळ ज्या रेती माफियांनी महसूल विभागातील ‘शुक्राचार्याला’ ‘माया’ पुरवली नाही, त्यांच्यावर नाममात्र कारवाई करून कारवाईचा ‘बागुलबुवा’ केला जातो आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली जाते. महागाव येथील ‘व्हाईट कॉलर’ रेती माफिया तहसीलची कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही महसूलच्या अधिकाऱ्याला गराडा घालून बसलेले असतात. या गोष्टीची सत्यता पडताळण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी तहसील कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यास सर्व स्पष्ट होईल. महागाव तालुक्यातुन होणारी ही रेती तस्करी महसूल विभागाच्या मूक संमतीने सुरू असल्याचे बोलल्या जात असल्याने महागाव महसूल विभागातील ‘शुक्राचार्याला’ शोधणे व शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून स्वतः ‘माया’ जमवून ‘गब्बर’ होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाईचे आव्हान जिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिज विभागासमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे.
________—————***** ▪️ *’कॉल डिटेल्स’ तपासल्यास ‘पितळ’ उघडं होईल* या संपूर्ण प्रकरणातील ‘मधुर संबंध’ उघडकीस आणण्यासाठी महागाव महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि वाहन चालकाचे ‘कॉल डिटेल्स’ तपासल्यास त्यांचे संपूर्ण तालुक्यातील रेती माफियांशी असलेले संबंध उघड होतील. यामुळे या ‘मलिन’ असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे पडेल.



