तहसील, पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र व नेमप्लेट बंधनकारक करण्याची मागणी हिमायतनगर / विष्णु जाधव

हिमायतनगर / विष्णु जाधव
तहसील, पंचायत समिती कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी शेतकरी, नागरिक तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख सहज होत नसल्याने संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी कोणत्या कामासाठी कार्यालयाबाहेर गेले आहेत, याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती मिळत नसल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर तहसील व पंचायत समिती कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र परिधान करणे, टेबलवर नाव व पदाची नेमप्लेट लावणे, तसेच कार्यालयीन कामानिमित्त बाहेर जाताना हालचाल रजिस्टरमध्ये आवश्यक नोंद करणे बंधनकारक करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तहसीलदार व पंचायत समिती कार्यालय, हिमायतनगर यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची ओळख स्पष्ट झाल्यास नागरिकांना संबंधित व्यक्तीशी थेट संपर्क साधता येईल आणि वारंवार कार्यालयाच्या चकरा मारण्याचा त्रास कमी होईल, असे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने ओळखपत्र परिधान करणे, टेबलवर नाव व पदाची नेमप्लेट ठेवणे आणि कार्यालयीन कामासाठी बाहेर जाताना हालचाल रजिस्टरमध्ये दिनांक, वेळ, स्वाक्षरी, जाण्याचे ठिकाण तसेच अंदाजे परतण्याची वेळ यांची नोंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यामुळे कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता वाढण्यासोबतच नागरिकांना संबंधित अधिकारी-कर्मचारी उपलब्ध आहेत की बाहेर गेले आहेत, याची स्पष्ट माहिती मिळू शकते. परिणामी शेतकरी व नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागणार नाही. या मागणीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक प्रशासकीय सूचना जारी करून अंमलबजावणी करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे यादव येणेकर यांनी केली आहे.



