Uncategorized

पळसपुर ग्रामपंचायतीच्या नाली सफाई कामावर प्रश्नचिन्ह; ४५ हजारांचा खर्च, तरीही अर्धवट काम झाल्याचा आरोप

हिमायतनगर  / विष्णु जाधव

पळसपुर ग्रामपंचायत कार्यालयामार्फत गावातील नाल्या उपसण्याचे काम करण्यात आले. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट आणि अर्धवट झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी नाल्यांची योग्य प्रकारे सफाई न झाल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर येत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गावातील मुख्य रस्ते तसेच वस्ती परिसरात पाणी साचत असल्याने पादचारी, दुचाकीस्वार आणि विशेषतः शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनली असून दुर्गंधी, डासांची वाढ आणि साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास तातडीने नाल्यांची सफाई व्यवस्थित पूर्ण करण्याची मागणी केली आहे. ग्रामसेवकांनी प्रत्यक्ष पाहणी करून अपूर्ण राहिलेली कामे त्वरित पूर्ण करून घ्यावीत, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नाली सफाईसाठी तब्बल ४५ हजार रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी काम अर्धवट राहिले असून निधीच्या अपहाराची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

यासंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तसेच ग्रामसेवक शिरारपल्लू हे मागील अनेक दिवसांपासून पळसपुर गावात आले नसल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. गावातील समस्या जाणून घेण्यासाठी ते उपलब्ध राहत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व आरोपांमुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित कामाची निष्पक्ष चौकशी होणार का, खर्चाचा हिशेब सार्वजनिक केला जाणार का आणि दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे पळसपुर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button