पळसपुर शिवारातील शेतांवर रोहींचा धुमाकूळ; पिकांचे मोठे नुकसान
वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी शेतकऱ्यांची मागणी

हिमायतनगर / विष्णु जाधव
पळसपुर शिवारातील शेतांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रोहींच्या मोठ्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिसरात तब्बल ६० ते ७० रोही वावरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, हे कळप रात्रीच्या वेळी शेतात घुसून सोयाबीन, कापूस, मूग तसेच हळदीच्या पिकांची नासधूस करत आहेत.
आधीच शेतमालाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच रोहींच्या सततच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, अनेकांच्या पिकांवर संकट ओढवले आहे. शेतकरी पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत असले तरी रोहींच्या मोठ्या कळपामुळे त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत.

विशेषतः नुकतेच उगवलेले सोयाबीन पीक रोही मोठ्या प्रमाणात फस्त करत असून, कापूस व मूग पिकांचीही तुडवून नासधूस केली जात आहे. हळदीच्या लागवडीचेही नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना आणि दुसरीकडे बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांनी वनविभागाकडे अनेकदा तक्रारी केल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप प्रभावी उपाययोजना झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने पळसपुर शिवाराची पाहणी करून रोहींचा बंदोबस्त करावा, पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
पावसाळी हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळी वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान थांबविण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



