नदीपात्रात ट्रॅक्टरचे ‘कळप’ पण अधिकाऱ्यांचे हात ‘रिकामे’
उमरखेड महसूल विभागाची गुप्तचर यंत्रणा फेल ?
फुलसावंगी / शैलेश वानखेडे
आज शनिवार, १४ मार्च रोजी निंगनूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. सर्व महसूल प्रशासन या शिबिरात व्यस्त असेल, याचा फायदा घेत बंदी भागातील पैनगंगा नदीपात्रात रेती माफियांनी ट्रॅक्टरचे ‘कळप’ उतरवले. मात्र, अचानक एका नायब तहसीलदारांनी दुचाकीवरून छापा मारल्याने माफियांमध्ये मोठी तारांबळ उडाली. प्रशासकीय गोपनीयतेवर माफियांनी मात केल्याने शेवटी या कारवाईत अधिकाऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही.
आज निंगनूर येथे भव्य शासकीय शिबिर असल्याने महसूल विभागाचे अधिकारी तिकडे व्यस्त राहतील, असा कयास भवानी, बोरगाव, चिखली आणि कुरळी येथील रेती माफियांनी बांधला होता. याच संधीचा फायदा घेत भवानी परिसरातील पैनगंगा नदीपात्रात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन सुरू झाले. नदीपात्रात ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या होत्या.
मात्र, सकाळी ११ वाजेच्या सुमारास उमरखेड महसूल विभागातील एका नायब तहसीलदाराने आपल्या वाहन चालकासह थेट दुचाकीवर स्वार होऊन नदीपात्रात धडक दिली. वरिष्ठ अधिकारी अचानक समोर आल्याने काही काळ माफियांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.
महसूल विभागाची ही मोहीम अत्यंत गोपनीय होती, पण माफियांचे खबऱ्यांचे जाळे इतके तगडे निघाले की, अधिकारी भवानी परिसरात पोहोचण्यापूर्वीच त्यांना कुणकुण लागली. कारवाई टाळण्यासाठी काही माफियांनी भरलेले ट्रॅक्टर रस्त्यावरच रिकामे केले, तर काहींनी मिळेल त्या वाटेने ट्रॅक्टर पळवले. यामुळे संबंधित नायब तहसीलदारांना प्रत्यक्षात एकही वाहन पकडता आले नाही आणि त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
या घटनेमुळे एक महत्त्वाची बाब समोर येते की, महसूल विभागाच्या गोपनीय मोहिमेची माहिती माफियांना आधीच कशी मिळते? प्रशासनाच्या गुप्तचर यंत्रणेपेक्षा रेती माफियांचे ‘लोकेशन तंत्र’ सध्या भारी पडत असल्याचे चित्र पैनगंगा नदीपात्रात पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे रेती माफियांवर प्रशासनाचा वचक उरला आहे की नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.



