हदगाव-कामारी-विरसणी-हिमायतनगर मार्गावर नवीन एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी – येणेकर
प्रवाशांची मोठी गैरसोय; विद्यार्थी, शेतकरी, महिला, व्यापारी व नागरिकांना दिलासा द्यावा

हिमायतनगर / विष्णु जाधव
हदगाव-कामारी-विरसणी मार्गे हिमायतनगर या मार्गावर नियमित आणि पुरेशी एसटी बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, महिला, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावर नवीन एसटी बस सेवा सुरू करून दिवसातून किमान तीन फेऱ्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात दैनिक कलमवीरच्या माध्यमातून यादवराव दत्तराव येणेकर यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हदगाव आगाराचे व्यवस्थापक यशवंत खिलारे यांची भेट घेऊन बससेवेबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी हदगाव-कामारी-विरसणी मार्गे हिमायतनगर अशी नवीन बस सेवा सुरू करण्याबाबत विनंती अर्ज सादर करण्यात आला.
हदगाव – हिमायतनगर या दोन्ही शहरांशी या मार्गावरील गावांचा दैनंदिन संपर्क आहे. शिक्षण, आरोग्य सेवा, शासकीय कार्यालयीन कामकाज, बाजारपेठ, रोजगार तसेच इतर विविध कारणांसाठी नागरिकांना दररोज या मार्गावरून प्रवास करावा लागतो. मात्र, सध्या या मार्गावर प्रवाशांच्या गरजेच्या तुलनेत नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांचा वेळ आणि आर्थिक खर्च दोन्ही वाढत आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी, शेतकऱ्यांना बाजारपेठ व शासकीय कार्यालयीन कामांसाठी, तर महिला व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सेवेसाठी प्रवास करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे या मार्गावरील नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन एसटी महामंडळाने सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. हदगाव-कामारी-विरसणी-हिमायतनगर मार्गावर प्रवाशांच्या सोयीच्या वेळेनुसार दिवसातून तीन फेऱ्यांचे नियोजन करून नवीन बस सेवा तात्काळ सुरू करावी, अशी मागणी यादवराव येणेकर यांनी केली आहे. या मागणीवर हदगाव आगार प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



