Uncategorized

सरसम–वाशी रस्त्यावरील अवैध मुरूम उत्खननाचा आरोप; महसूल प्रशासन झोपेत की संगनमतात ?

 

 

हिमायतनगर / विष्णु जाधव

हिमायतनगर तालुक्यातील सरसम ते वाशी या रस्त्याच्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणावर विना परवाना मुरूम उत्खनन सुरू असल्याचा आरोप होत आहे. संबंधित ठिकाणाहून ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुमारे १० किलोमीटरपर्यंत मुरूमाची वाहतूक होत असल्याचे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकरणी महसूल प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरसम–वाशी रस्त्याचे काम UND (यु.एन.डी.) कन्स्ट्रक्शन या कंपनीमार्फत सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित कंत्राटदाराकडे मुरूम उत्खननासाठी आवश्यक परवान्याबाबत विचारणा केली असता, “महसूल प्रशासनाने उत्खनन करण्यास तोंडी परवानगी दिली आहे. आम्ही काम करत आहोत, तुम्हाला जे करायचे ते करा,” असे उत्तर दिल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे.

यानंतर कार्यकर्त्यांनी सरसम येथील महसूल मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, “आज शनिवार असल्याने मी येऊ शकत नाही,” असे उत्तर मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या कथित अवैध उत्खननाकडे महसूल प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, अथवा यामागे संगनमत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची तक्रार हिमायतनगर तहसीलदारांकडे करण्याचा निर्णय घेतला असून, योग्य कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही दिण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी करून, उत्खनन नियमबाह्य आढळल्यास संबंधित कंत्राटदार तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button