विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; हिमायतनगर येथील आश्रमशाळेची चौकशी करा – नागोराव शिंदे

हिमायतनगर / दाऊ गाडगेवाड
हिमायतनगर येथील मातोश्री जतनबाई रामसिंग शेवटकर प्राथमिक/माध्यमिक वि.जा.आ.ज. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत तसेच शाळेतील कथित प्रशासकीय अनियमिततेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास), किनवट यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, आश्रमशाळेतील वस्तीगृहाचे अधीक्षक व काही शिक्षक मुख्यालयात राहत नसून बाहेरगावाहून ये-जा करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शाळेत कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे म्हटले आहे. काही विद्यार्थी परवानगीशिवाय वस्तीगृहाबाहेर जात असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना दर्जेदार व पुरेसे भोजन मिळत नसल्याबाबतही पालकांकडून तक्रारी होत असल्याचे निवेदनात नमूद आहे. याशिवाय ४ जुलै रोजी सायंकाळी काही विद्यार्थी शाळेबाहेर जात असताना भरधाव वाहनाच्या धडकेपासून थोडक्यात बचाव झाल्याची घटना घडल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे पालकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे.
या सर्व प्रकरणाची तक्रारदारांच्या उपस्थितीत सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर प्रशासकीय कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आमरण उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते नागोराव शिंदे, गंगाधर गायकवाड , देवानंद गुंडेकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.



