शहीद नरसिंग शिवाजी जिल्लेवाड यांचा ९ वा स्मृतिदिन उत्साहात संपन्न

नांदेड़ / विजय वाठोरे
शहीद नरसिंग शिवाजी जिल्लेवाड यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त भोकर शहरात अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ वाजता व्यंकटेश टॉकीज, चिखलवाडी येथून रॅलीला सुरुवात झाली. शहीद नरसिंग शिवाजी जिल्लेवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅली मुदखेड रोडमार्गे नांदेड बायपास रोडवरून पुढे शहीद स्मारकाच्या ठिकाणी पोहोचली.
या रॅलीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक गणेश डुबुकवाड, भोई समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजू अण्णा मामूलवार, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सिंधुताई निलेवार, ज्ञानेश्वर गंदलवाड, नगरसेवक संजय सुभाषराव घंटलवार, डॉ. व्यंकटेश निलेवार, तालुकाध्यक्ष राजू पंदिलवाड यांच्यासह हिमायतनगर व उमरी येथून आलेले पदाधिकारी, भोकरचे पदाधिकारी, समाजबांधव आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शहीद स्मारकाच्या ठिकाणी इंडियन तिबेट बॉर्डर पोलिस दलाच्या ४४ व्या बटालियनचे सब-इन्स्पेक्टर बिपण कुमार यांनी सलामी देत शहीद नरसिंग शिवाजी जिल्लेवाड यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण केला. यावेळी सरताज सिंह यांनीही सलामी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल भारतीय भोई समाजाचे नांदेड जिल्हाध्यक्ष दत्ता टोकलवाड यांनी केले, तर प्रस्तावना ज्येष्ठ समाजसेवक गणेश डुबुकवाड यांनी केली. यावेळी ITBPचे सब-इन्स्पेक्टर बिपण कुमार, भोई समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजू मामूलवार, राष्ट्रीय सदस्य श्री. गलपवाड, श्रीमती सिंधुताई निलेवार आणि नगरसेवक संजय घंटलवार यांनी शहीद नरसिंग शिवाजी जिल्लेवाड यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच शहीद स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. डॉ. व्यंकटेश निलेवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास अखिल भारतीय भोई समाजाचे जिल्हाध्यक्ष गणपत पांडलवाड, भोई समाज महासंघाचे कोषाध्यक्ष राजू वालगोटेवाड, वनलवाड सर, श्रीराम टोपलवाड, साहेबराव अष्टकर, माधव वडतवाड, निषाद पार्टीचे तालुकाध्यक्ष येणूरवाड यांच्यासह भोकर शहरातील नागरिक, भोई समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शहीद नरसिंग शिवाजी जिल्लेवाड यांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून समाजबांधवांनी त्यांच्या कार्याची व देशसेवेची आठवण जागवली.



