कायाधू नदीचा प्रवाह बदलल्याने शेतकऱ्याच्या शेतात पाणी; शासनाने तातडीने उपाययोजना करावी

नांदेड / दाऊ गाडगेवाड
रुई–धानोरा परिसरातून वाहणाऱ्या कायाधू नदीवरील मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आलेला कोल्हापुरी बंधारा वाहून गेल्याने नदीच्या प्रवाहाची दिशा बदलली आहे. बंधाऱ्याच्या बाजूने नदीचे पात्र बदलल्यामुळे पाण्याचा प्रवाह धानोरा येथील शेतकरी मारूती रामराव शिंदे यांच्या शेतातून वाहत असल्याची बाब समोर आली आहे.
नदीचा प्रवाह शेतातून गेल्यामुळे संबंधित शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान होत असून, भविष्यातही मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासन व संबंधित विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.
कायाधू नदीच्या पात्राची प्रत्यक्ष पाहणी करून नदीचा बदललेला प्रवाह पूर्ववत करावा, वाहून गेलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी तसेच शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. “शेतकऱ्याच्या शेतातून नदीचा प्रवाह वाहत असताना प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी. संबंधित शेतकऱ्याला शासनाने न्याय व मदत मिळवून द्यावी,” अशी मागणी अमोल कदम, सरपंच तथा प्रदेश उपाध्यक्ष, किसान सभा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी केली आहे. या प्रकरणात संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही न केल्यास शेतकऱ्यांच्या नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने वेळ न दवडता प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना करण्याची गरज आहे.



