Uncategorized

हु. ज. पा. महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सद्भावना दिन’ उत्साहात साजरा

राजीव गांधी जयंतीनिमित्त एकात्मतेचा संदेश ; सद्भावना प्रतिज्ञेने कार्यक्रमाला मिळाली सामाजिक बांधिलकीची धार

 

 

हिमायतनगर : विजय वाठोरे

 

भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर येथे ‘राष्ट्रीय सद्भावना दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जात, धर्म, भाषा आणि प्रांताच्या भिंती ओलांडून राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते होत्या. इतिहास विभागप्रमुख डॉ. वसंत कदम यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सद्भावना दिनाचे महत्त्व पटवून देत देशाची खरी ताकद ही विविधतेत नांदणाऱ्या एकतेत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. कृष्णानंद पाटील यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमातील सर्वाधिक महत्त्वाचा क्षण म्हणजे उपस्थितांनी घेतलेली राष्ट्रीय सद्भावना प्रतिज्ञा. देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्यासोबतच सर्व समाजघटकांमध्ये बंधुभाव, परस्पर आदर आणि सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात ‘भेद नव्हे, बंधुभाव; संघर्ष नव्हे, सद्भावना आणि विघटन नव्हे, राष्ट्रीय एकात्मता’ हा सकारात्मक विचार रुजविण्याचा संदेश देण्यात आला.राजीव गांधी यांच्या जयंतीला केवळ अभिवादन न करता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये आचरणात आणण्याचा घेतलेला संकल्प, हीच या कार्यक्रमाची खरी फलश्रुती ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button