निसर्गाच्या कुशीत ‘शिकण्याचा आनंद’!
पी.एम.श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सरसम बु.च्या विद्यार्थ्यांची अविस्मरणीय नैसर्गिक सहल उत्साहात संपन्न

हिमायतनगर / विष्णु जाधव
पुस्तकातील धडे केवळ वर्गाच्या चार भिंतीत न शिकवता,निसर्गाच्या सान्निध्यात प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम पी.एम.श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सरसम बु.ने राबविला. शाळेतील विद्यार्थ्यांची नैसर्गिक सहल हिमायतनगर तालुक्यातील सोनारी पोटा येथील महादेव मंदिर व डोंगर परिसरास भेट देऊन उत्साह, आनंद आणि कुतूहलाच्या वातावरणात संपन्न झाली.विद्यार्थ्यांनी इथल्या परिसरातील लाल मातीचे नमुने जमा केले. विविध प्रकारच्या झाडांचे,रोपांचे निरीक्षण केले. इथल्या नैसर्गिक परिसराचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर वनभोजनाचाही आस्वाद घेतला.

हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, दाट वनराई, विविध प्रकारची झाडे-वेली आणि निसर्गाचा मनोहारी परिसर पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. डोंगराच्या चढ-उतारातून शिस्तबद्धपणे भ्रमंती करताना विद्यार्थ्यांनी निसर्गाशी एकरूप होण्याचा अनोखा अनुभव घेतला.या सहलीत विद्यार्थ्यांना विविध वनस्पती, झाडांचे महत्त्व, पर्यावरणाचे संतुलन, जैवविविधता आणि निसर्ग संवर्धन याबाबत प्रत्यक्ष निरीक्षणातून माहिती देण्यात आली.त्यामुळे ‘पाहा, अनुभवा आणि शिका’ या संकल्पनेला या सहलीत प्रत्यक्ष मूर्त स्वरूप मिळाले.
सहल म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला अनुभवाची, कल्पनाशक्तीला पंखांची आणि व्यक्तिमत्त्वाला आत्मविश्वासाची जोड देणारे प्रभावी माध्यम आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. डोंगरवाटेवरून एकमेकांचा हात धरून, परस्परांना साथ देत विद्यार्थ्यांनी केलेली वाटचाल ही सहकार्य, शिस्त आणि संघभावनेचा सुंदर धडा देणारी ठरली.विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत सहलीचे नियोजन व सुरक्षिततेची काळजी घेतली. निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांनी आनंद घेतला तसेच पर्यावरण जपण्याचा संदेशही मनात रुजविला.
शाळेच्या चार भिंतींपलीकडे निसर्गाच्या खुल्या वर्गात भरलेला हा ज्ञानाचा तास विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. शिक्षणाला आनंदाची आणि अनुभवाची जोड देणारी पी.एम.श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सरसम बु.ची ही नैसर्गिक सहल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील एक सुंदर आठवण ठरली.
या सहलीत शाळेचे केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक गणेश कोकूलवार सर, कोडगिरे सर, वाडकर सर, घाळाप्पा सर, खंदारे सर,चव्हाण सर, सुलफुले मॅडम, पवार मॅडम,बोंगाळे मॅडम, व्यवहारे मॅडम, सेवक संभाजी सूर्यवंशी यांच्यासोबत शाळेतील इतर कर्मचारीही सहभागी होते.



