Uncategorized

तुझ्या कायम श्रमाचे होत जावे चीज बाई कधी तू चांदणी शीतल कधी तू वीज बाई

चौथ्या जनहित साहित्य संमेलनात गझलसंध्या रंगली

 

नांदेड / विजय वाठोरे

राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा (दे.) ता.लोहा जि.नांदेड आयोजित चौथे राज्यस्तरीय जनहित मराठी ग्रामीण साहित्य संमेलन दि.८ मार्च २०२६ रोजी श्री.दत्तात्रय मठ संस्थान,मोहनपुरा येथे उत्साहात संपन्न झाले.संमेलनाध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका डॉ.ललिता मुकुंद बोकारे,मुख्य संयोजक भैय्यासाहेब गोडबोले व मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी,परिसंवाद,कथाकथन, गझलसंध्या व कविसंमेलन सत्रांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

        जागतिक महिला दिनानिमित्त महिलावर्गाला समर्पित गझलसंध्येची सुरुवात हिमायतनगर येथील पुरवठा निरीक्षक,गझलकारा छाया नागर्थवार यांनी केली.

 

जसा जगात यायला बराच वेळ लागला

जगायचे शिकायला बराच वेळ लागला…

कुणी कमी वयातही चलाख फार जाहला

मला तसे बनायला बराच वेळ लागला…

अशा सुंदर शेरांनी त्यांनी रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली व गझलसंध्येचा आगाज केला.

 

भिमाची बघ तिला मोठी तमा होती

समंजस त्यागमूर्ती ती रमा होती…

शिवबासमान येथे उरला कुणीच नाही

दिसते हरेक महिला आईबहीण ज्याला…

 

लाखो विवंचनांशी लढतो मराठवाडा

जोशामधे तरीही जगतो मराठवाडा…

होतात आत्महत्या येथे उगाच नाही

कर्जात बाप रुतता कन्हतो मराठवाडा

     अशा दमदार शेरांमधून हिमायतनगर येथील युवा पत्रकार,गझलकार विजय वाठोरे (साहिल) यांनी रसिकांची दाद मिळवली.

 

वाद जेथला तिथे सोडणे सुंदर असते

माझ्यामधले मीपण जळणे सुंदर असते…

पाहून माणसाला फसतो बऱ्याचवेळा

अंदाज आरशाचा चुकतो बऱ्याचवेळा…

ती सरिता निखळ तिला तर मनभरून जगता येते

मी “कातळ काठावरचा” मज कुठे वाहता येते?

अशा सहजसुंदर शेरांच्या सुरेल तरन्नुम सादरीकरणाने गंगाखेड येथील प्रसिद्ध गझलकार डॉ.यशवंत मस्के यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

 

बळीराजा बुडाला खोल यंदाही

पिकाला भाव कवडीमोल यंदाही…

 

आतल्या कोलाहलाचा शोध घेतो

रोज मी माझ्या मनाचा शोध घेतो…

पाचवीला पूजलेले दुःख आहे

आणि मी वेडा सुखाचा शोध घेतो…

 

एकदा दोनदा तीनदा पाहिले

क्षणभरातच तुला लाखदा पाहिले…

अशा वास्तववादी आशयघन शेरांनी पुसद येथील प्रसिद्ध गझलकार सतीश देशमुख यांनी रसिकांना अंतर्मुख केले.

 

अंधश्रद्धा मला सत्य वाटायची

माय जेंव्हा कधी दृष्ट काढायची…

काजळासारखा रंग माझा तरी

माय माझी मला तीट लावायची…

बर्फगोळा मला खूप पोळायचा

माय जेंव्हा जुनी नोट मोडायची…

अशा सिग्नेचर शेरांनी गंगाखेड येथील सुप्रसिद्ध गझलकार आत्माराम जाधव यांनी रसिकांची भरभरुन दाद मिळवली.

 

तुझ्या कायम श्रमाचे होत जावे चीज बाई

कधी तू चांदणी शीतल कधी तू वीज बाई…

तुला अवघ्या जगाचे समजते दुखणे परंतू

कळत नाही तुझे कोणासही काळीज बाई…

 

कोणी सुरेल अथवा कोणी कसे म्हणा

गाण्यास जीवनाच्या जमते तसे म्हणा..

येतील आड त्यांचे आधी रचा सरण

नंतर रडत विचारा..घडले कसे म्हणा?

चालीत फरक अमुच्या नाही पडायचा

कासव म्हणा कुणी वा कोणी ससे म्हणा…

अशा दमदार शेरांनी नांदेड येथील प्रसिद्ध गझलकार, सूत्रसंचालक चंद्रकांत कदम (सन्मित्र) यांनी रसिकांना खिळवून ठेवले.

 

दिसतो म्हणे जगाला विठ्ठल तुझ्यात आई

का मग मलाच दिसतो विठ्ठल तुझ्यात आई…

आई तुझ्या मुलाला कोळून पाज शिवबा

त्याला दिसेल परक्या स्त्रीच्या रुपात आई…

 

खुल्या आहेत खिडक्या पण पहारा बंद दारांचा

करावा लागला छोटा तिला आकार पंखांचा…

तुझा सांभाळ तू बाई सरकता काठ पदराचा

कुणीही राहिला नाही इथे निष्पाप डोळ्यांचा…

 

असे मार्मिक,वैचारिक शेर तसेच “येता जाता..” या आपल्या सिग्नेचर गझलेच्या सादरीकरणाने गझलसंध्या अध्यक्ष पालम येथील सुप्रसिद्ध गझलकार आत्तम गेंदे यांनी अध्यक्षीय समारोप करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.गझलसंध्याचे सूत्रसंचालन गझलकार चंद्रकांत कदम (सन्मित्र ) यांनी केले.मुख्य संयोजक भैय्यासाहेब गोडबोले यांनी सर्वांचा यथोचित सत्कार केला..आभार विद्रोही कवी प्रज्ञाधर ढवळे यांनी मानले..महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांना समर्पित गझलसंध्या यादगार ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button