भीषण पाणीटंचाई, पैनगंगा नदी कोरडी, अनेक गावांवर संकट

हिमायतनगर / विष्णु जाधव
हिमायतनगर तालुक्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे राहिले आहे. तालुक्यातील अनेक गावे पिण्याच्या पाण्यासाठी पैनगंगा नदीवर अवलंबून असताना, हीच नदी पूर्णपणे कोरडी पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पळसपूर, डोल्हारी, घारापूर, दीघी, शिरपल्ली यांसारख्या गावांमध्ये पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. वाढत्या उन्हामुळे विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खाली गेली असून अनेक बोअरवेल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.
स्थानिकांच्या मते, दरवर्षी उन्हाळ्यात ही समस्या निर्माण होत असली तरी यंदा परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. पैनगंगा नदीवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनाही ठप्प झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
दरम्यान, या गंभीर परिस्थितीकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरीकांकडून केला जात आहे. तातडीने पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करावी, टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पाणीटंचाईचे हे वाढते संकट लक्षात घेता प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



