Uncategorized

रक्तात भीम माझ्या हृदयामधे शिवाजी  याहून श्रेष्ठ कुठली मी खानदान सांगू!

हिमायतनगर येथे रंगला ऐतिहासिक गझल मुशायरा 

 

 

नांदेड – विजय वाठोरे

 

संवेदना फाउंडेशन व महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने हिमायतनगर येथे प्रथमच ऐतिहासिक मराठी गझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.कालवश उत्तमराव पंडित यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.या गझल मुशायऱ्याचे अध्यक्ष महागाव येथील सुप्रसिद्ध गझलकार गजानन दादा वाघमारे हे होते तर सूत्रसंचालन सुप्रसिद्ध गझलकार चंद्रकांत कदम (सन्मित्र) यांनी केले.

 

या गझल मुशायऱ्याची सुरुवात पुसद येथील विद्यार्थीप्रिय शिक्षक तथा प्रसिद्ध गझलकार सतीश देशमुख यांनी आपली गझल सादर करत केली.

म्हणायला सगळ्या विश्वाची गोष्ट निराळी आहे

पण माझ्या भारत देशाची गोष्ट निराळी आहे

जरी मुलांनो धडा संपला स्वातंत्र्याचा येथे

एक पुन्हा आंबेडकरांची गोष्ट निराळी आहे

अशा दमदार शेरांनी साद घालत गझल मैफिलीचा दमदार आगाज केला.आंबेडकरी चळवळ, विद्यार्थी जीवन,शिक्षकी पेक्षा अशा विविध पैलूंनी नटलेली गझल सतीश देशमुख यांनी सादर केली.

 

यानंतर हिमायतनगर येथील विद्यार्थीप्रिय शिक्षक तथा गझलकार विजय धोबे यांनी आपली गझल सादर केली.

बांधले घरटे नवे अन खूप केली रोषणाई

पण घराला जोडणारी ती तुळस गावीच होती

वादळाची झुंजणारे शब्द शस्त्रांचे पुजारी

तारणारी भारताला ती निळी शाईच होती

अशा बहारदार काळजाला हात घालणाऱ्या शेरांनी गझलकार विजय धोबे यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.

 

यानंतर गझलकारा रोहिणी पांडे यांनी त्यांची वैविध्यपूर्ण आशयाने नटलेली गझल सादर केली.

भीती वाटते वखवखलेल्या नजरांची

देवा आता स्त्री-देहाची बाभळ कर

आयुष्य कर्मणी हे प्राधान्य कर्म आहे

कर्त्यास लाभले का कोठेच नाव नाही?

ब्रँडेड दुर्गुणांनी मार्केट फुल्ल झाले

भावात सद्गुणांच्या हल्ली उठाव नाही

असे सुंदर शेर सादर करत रसिकांची मने जिंकली.

 

यानंतर पुसद येथील लेखिका, गझलकारा निशा डांगे नायगांवकर यांनी पुढील शेर सादर केले.

आरसा सांगतो आरशाला पुन्हा

पारखावे जरा माणसाला पुन्हा

छान दिसतो निळा शर्ट सुद्धा तुला

एकदा घाल ना पाडव्याला पुन्हा

यासोबतच त्यांनी मायलेकीचे नाते अधोरेखित करणारी सुंदर गझल सादर केली.

कळवून एवढे बस पत्रात देत आहे

आई दिल्या घरी मी अगदी मजेत आहे

आता नको सुखाची कसलीच वाहवाही

दुःखास बाळसे या दररोज येत आहे

अशा आशयघन शेरांना रसिकांची भरभरून दाद मिळाली.

 

कसे बाळास देते गार वारे काय सांगू मी?

किती पदरामधे जळते निखारे काय सांगू मी?

असा ना एकदा वा दोनदा..तो सारखा होतो

तुला पाहून का माझा गुलाबी चेहरा होतो

व्यथेला फक्त औषध लागते ‘स्वाती’ असे नाही

मनाचे दुःख ओसरले तरी रोगी बरा होतो

अशा मार्मिक व आशयघन शेरांनी प्रसिद्ध गझलकारा डॉ.स्वाती भद्रे-आकुसकर यांनी रसिकांना अंतर्मुख केले व दाद मिळवली.

 

मला उचलून घेण्याला पुढे सरसावली आहे

भिमाच्या संविधानाची मिळाली सावली आहे

मनुष्याच्याच माणुसकीत मी पीएचडी केली

अखेरी ती मला श्वानामधे या गावली आहे

अशा हटके खयाल असणाऱ्या पत्रकार गझलकार विजय वाठोरे (साहिल) यांच्या शेरांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

यानंतर पालम येथील सुप्रसिद्ध गझलकार आत्तम गेंदे यांनी सदाबहार शेर..गझला सादर केल्या.

गुंड मवाली किंवा कुठला दादा नाही

पण मी दिसतो तितका सुद्धा साधा नाही

मुलांना लागता सुट्ट्या तिला माहेर आठवले

पुन्हा भेटायला आल्या जुन्या गावातल्या जखमा

तुझ्या निर्वाण दुःखाचे इथे होणार बघ आत्तम

अता बुद्धास भेटाया तुझ्याही चालल्या जखमा

याबरोबरच रसिकांना अंतर्मुख करणारे मार्मिक शेर सादर केले.

 

युद्धाने जग जिंकू शकतो या ज्ञानाचे काय करू मी?

बुद्ध भेटल्यानंतर तुमच्या सिकंदराचे काय करू मी?

कशा गेल्या फुले विसरून सावित्री तुझ्या लेकी

पुन्हा बसल्या दगड मांडून सावित्री तुझ्या लेकी

कराया लागल्या आता तुझी पूजा मुहूर्तावर

बदलल्या ना तुला वाचून सावित्री तुझ्या लेकी

अशा एकसे बढकर एक शेरांनी गझलकार आत्तम गेंदे यांनी गझल मुशायऱ्यात जान आणली.

 

मागा जिवास माझ्या कोणी खुशाल पण

मागू नका कुणीही माझी जखम मला

करणार काय कुठले शस्त्रास्त्र वाकडे?

मी धारदार आहे..केले कलम मला!

असतील काय लेकी सावित्री जोतिबाच्या?

आंब्यामुळे मुलींना ज्या पोरबाळ होते

असतो वकूब न्यारा प्रत्येक लेखणीचा

कोणी ढिसाळ होते..कोणी ‘ढसाळ’ होते

अशा जबरदस्त शेरांनी सूत्रसंचालक गझलकार चंद्रकांत देवराव कदम (सन्मित्र) यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

 

भुकेले तरी..पोटभर काढते

तुझी आठवण रोज घर काढते

कधी माय होती जवळ घ्यायला

अता लेक माझी नजर काढते!

अशा आशयघन गझलेच्या बहारदार तरन्नुम सादरीकरणाने सन्मित्र यांनी रसिकांची वाहवा मिळवली व मुशायरा अधिक उंचीवर नेला.

 

माणसांची ठरविते औकात हल्ली

पाहिजे ब्रँडेड साली जात हल्ली

फक्त म्हणालो जात धर्म ही व्याधी आहे

त्यांनी म्हटले तू तर ‘नक्षलवादी’ आहे

जात्यांध लोक झाले,धर्मांध देश झाला

मी कोणत्या मुखाने भारत महान सांगू?

हे धर्मग्रंथ मित्रा बांधून ठेव सारे

या आंधळ्या पिढ्यांना चल संविधान सांगू

रक्तात भीम माझ्या हृदयामधे शिवाजी

याहून श्रेष्ठ कुठली..मी खानदान सांगू?

अशा एकाहून एक सरस मुकर्रर शेरांनी गझल मुशायरा अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार गजानन वाघमारे दादांनी रसिकांना अंतर्मुख केले..भरभरुन दाद मिळवली व मुशायऱ्याची सांगता केली.

 

हिमायतनगर सारख्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच संपन्न झालेला हा ऐतिहासिक गझल मुशायरा ठरला.असे सातत्यपूर्ण गझल मुशायरे गझल चळवळ अधिक गतिमान करतील यात शंका नाही. या गझल मुशायर्‍याचे आयोजन संवेदना फाउंडेशनचे सल्लागार रमेश पंडित व महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज चे संपादक विजय वाठोरे सरसमकर यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button