स्वस्त धान्य दुकानदाराची तक्रार तहसिलदार यांच्या दालनात
गंगाधर वाघमारे / हिमायतनगर

तालुक्यात गैरव्यवहाराची मालीका काय संपता संपत नसून एका मागून एक गैरव्यवहाराचे प्रकरणे समोर येत आहेत. ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराची मालीका चालू असताना आता तालुक्यातील सिरंजनी येथील राशन पुरवठा धारकाने गैरव्यवहार केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

सविस्तर माहीतीनुसार सिरंजनी येथील राशन पुरवठा धारकाच्या विरोधात येथील सरपंच व ग्रामस्थांनी गैरव्यवहार करत असल्याची तक्रार तहसिलदार यांच्या दालनात केली आहे. त्याचे झाले असे की, येथील स्वस्त धान्य दुकानदार चिंतावार यांच्यावर ईकेवायसी प्रकरणात कार्यवाही करून त्यांचा परवाना रद्द केल्यानंतर येथील स्वस्त धान्य वितरीत करण्याची जवाबदारी कैलास डुडूळे यांच्याकडे देण्यात आली परंतु डुडूळे गावात स्वस्त धान्य वाटप करताना दारू पिऊन दुकानात येत असून नागरीकांना उद्धट भाषा वापरून धान्य वितरीत करत आहेत. नागरीकांसोबत त्यांची वर्तणुक चांगली राहीली नाही. तसेच शासनाकडून मोफत दिल्या जाणाऱ्या धान्याची अफरातफर करत असल्याची तक्रार येथील सरपंचासह ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे संबंधीत राशन पुरवठा धारकांची सखोल चौकशी करून कठोर कार्यवाही करण्यात यावी तसेच इतर दुसऱ्या राशन धारकाकडे सिरंजनी स्वस्त धान्य वितरीत करण्याची जबाबदारी देण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषणाला बसावे लागेल असा इशारा सिरंजनी येथील सरपंचासह ग्रामस्थांनी दिला आहे.



