महा ई सेवा केंद्राकडे जाण्यासाठी रस्ताच नाही, रस्त्याअभावी नागरीकांचे होत आहेत हाल

दाऊ गाडगेवाड हिमायतनगर प्रतिनिधी /-
महा ई सेवा केंद्र हे शासकीय योजनाच्या सुविधा नागरीकांपर्यत पुरवण्याचे काम करते. महीला, विद्यार्थी , वृद्ध या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. महा ई सेवा केंद्र शासन आणि नागरीक यांच्यामध्ये देवाण-घेवाणीचा महत्वाचा दुवा आहे. अशा ठिकाणी जाण्यासाठी नागरीकांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सविस्तर माहीतीनुसार हिमायतनगर शहरातील वार्ड क्रं.१३ मध्ये राष्ट्रीय महामार्गाला लागून महा ई सेवा केंद्र असून लाडकी बहीण योजनेची केवायसी, फार्मर आयडी, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, आधार काढणे, असे अनेक ऑनलाईन कामे करण्यासाठी महीला, विद्यार्थी, वृद्ध मोठ्या संख्येने येतात. परंतू येथे येण्यासाठी नागरीकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण या महा ई सेवा केंद्राकडे जाण्यासाठी रस्ताच नाही. पावसाळा सुरू झाला तेव्हापासून त्या महा ई सेवा केंद्राला लागूनच नाला असल्याने तेथे घाण पाणी जमा होत असून दुर्गंधी पसरली आहे. डासांचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरीकांचे व तेथे कामा निमित्त येणाऱ्या नागरीकांच्या आरोग्याशी नगरपंचायत प्रशासन खेळ खेळत असल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी नागरीकांना सेवा सुविधा पुरविली जाते त्या ठिकाणी जाण्यासाठी नागरीकांची रस्त्या अभावी दुर्दशा केली जाते. एकीकडे नगरपंचायत प्रशासन म्हणते आमच्याकडून नागरीकांना सुलभ, सोईस्कर सुविधा पुरविली जाते आणि दुसरीकडे त्याच नागरीकांची सुविधे अभावी दुर्दशा करायची असा विडाच हिमायतनगर नगरपंचायत प्रशासनाने उचलल्याचे दिसून येते. येथे कामा निमित्त येणारे नागरीक व तेथे राहणाऱ्या नागरीकांकडून मागील चार पाच वर्षापासून या महा ई सेवा केंद्राकडे जाण्यासाठी रस्ता करावा अशी मागणी केली जात आहे. मात्र याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष्य केल्या जात असून नगरपंचायत प्रशासन शहरात बोगस कामे कसे करता येईल याकडे जास्त लक्ष्य देत असल्याचे शहरासह तालुक्यातील सुज्ञ नागरीक बोलताना दिसून येत आहेत.
एकंदरीतच नगरपंचायतीच्या निवडणुका रखडलेल्या असल्याने जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी नसल्याने नगरपंचायतीमधील प्रशासकीय अधिकारी यांचा मनमानी कारभार चालू असून हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचे देखील जनतेत बोलल्या जात आहे. या महा ई सेवा केंद्राकडे जाण्यासाठी रस्ता कधी बनल्या जाईल हे तुर्तास तरी सांगता येणार नसून नागरीकांचे मात्र होल होत आहेत, ही आज घडीला वास्तव परिस्थिती आहे.



