कामचुकार मंडळ अधिकाऱ्यांना निलंबित करा – विजय वाठोरे
दलित पॅंथरचे हिमायतनगर तालुका अध्यक्ष विजय वाठोरे यांनी तहसीलदारांना दिले निवेदन

विष्णु जाधव / हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यातील सरसम सज्जा येथे मंडळ अधिकारी म्हणून कार्य करत असलेल्या मंडळ अधिकारी पवार मॅडम या कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयात हजर न राहता वेळेच्या आधीच घराला निघून जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वरून सामान्य नागरिकांना कामासाठी आपल्या कार्यालयात अनेक चकरा मारायला भाग पाडत आहेत. सामान्य माणसाला सोडा पण पत्रकार बांधवांना सुद्धा कार्यालयीन वेळेत कार्यालयात काम करून देण्यासाठी भेटत नाहीत. या मंडळ अधिकाऱ्याबाबत अनेक तक्रारी सामान्य माणसाकडून होत होत्या. यासंबंधी दलित पॅंथरचे तालुका अध्यक्ष विजय वाठोरे व दाऊ गाडगेवाड यांनी हिमायतनगरच्या तहसीलदार सौ पल्लवी टेमकर यांना निवेदन देत या कामचुकार मंडळ अधिकारी यांना निलंबित करा अन्यथा लोकशाही मार्गाने पँथर स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

हिमायतनगर तालुक्यामध्ये अधिकारी लोकांवर कुणाचाही वचक राहिला नसून अनेक अधिकारी काम चुकार बनले आहेत. कधीही यायचे आणि कधीही जायचे हे सर्वांच्या अंगवळणी पडलेले आहे. कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयात उपस्थित न राहता गोरगरीब,सामान्य लोकांची कामे प्रलंबित ठेवण्याचा हातखंडा अनेक अधिकाऱ्यांचा असल्याचा निदर्शनास येतो. सामाजिक कार्यकर्ते विजय वाठोरे हे आपल्या एका कामानिमित्त सरसम मंडळाच्या मंडळ अधिकारी असलेल्या पवार मॅडम यांच्याकडे गेले होते.त्यांना मंडळ अधिकारी यांनी अमुक तमुख कागदपत्र आणा तेव्हा करतो.म्हणत १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस घोळवत ठेवले. शेवटी दिनांक २ फेब्रुवारी रोजी विजय वाठोरे हे मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात साडेतीन ते चार च्या दरम्यान गेले असता मंडळ अधिकारी कार्यालयात हजर नव्हत्या. त्यांनी फोन करत कामाबद्दल विचारणा केली. पण मंडळ अधिकारी पवार मॅडम यांनी उडवा उडवीची उत्तरे देत मी आता घराकडे निघाले आहे. मला जायला गाडी नाही.तुम्ही गाडी करून देता का ? या भाषेत बोलत उत्तर दिले.नंतर त्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी सुद्धा आल्या नाहीत. उलट कार्यालयातील कारकूनच सर्व कागदपत्रांवर
शिक्के मारून सह्या करतो. ही बाब लक्षात आली. यामुळे दलित पॅंथर चे तालुका अध्यक्ष विजय वाठोरे यांनी हिमायतनगरच्या तहसीलदार सौ पल्लवी टेमकर मॅडम यांच्याकडे निवेदन देत या कामचुकार मंडळ अधिकारी यांना तात्काळ निलंबित करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असे निवेदन दिले.
या निवेदनात विजय वाठोरे यांनी संबंधित मंडळ अधिकारी यांना निलंबित करा,तालुक्यातील श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजना व इतर योजनेसाठी लागणारी २१००० चे उत्पन्न व लाभार्थ्यांची चौकशी करून निकषात असलेल्यांनाच योजनेचा लाभ द्यावा अन्यथा त्यांना योजनेतून बाद करण्यात यावे.अनेक बोगस लाभार्थ्यांना सह्या सिक्के देऊन योजनेमध्ये बोगस लाभार्थ्यांची भरती झाल्याची शंका निवेदनकर्त्यांना असल्यामुळे त्यांनी सदर बाबीची तात्काळ चौकशी करून याचा छडा लावावा.अश्या मागण्या केल्या आहेत.या कामचुकार मंडळ अधिकारी यांना निलंबित न केल्यास पॅंथर स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराही दलित पॅंथर चे हिमायतनगर तालुका अध्यक्ष विजय वाठोरे व दाऊ गाडगेवाड यांनी दिला आहे.



